हजार बाराशे वर्षांपूर्वी निर्माण झालेली स्थापत्य शैली मंदिर रूपाने आजही नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी बघायला मिळते. आपल्या पूर्वजांनी, कारागिरांनी, उभी केलेली ही कलामंदिरे आज फक्त देवदर्शनासाठीच वापरली जातात पण त्या स्थपतींना, कारागिरांना, त्या मंदिरांच्या माध्यमातून आपल्याला काही सांगायचे होते हे विसरुनच गेलो आहे. या मंदिरांच्या भोवती फिरणाऱ्या कथा, गोष्टी आता आपल्याला कळतच नाहीत. यातील अनेक मंदिरे तर जीर्ण अवस्थेत आहेत. काहींना ऑइल पेंटने रंगवलेले आहे तर काहींना आधुनिक साहित्य वापरुन चकाचक(?) केले आहे.
मुळात सर्वप्रथम भारतीय आणि त्यानंतर महाराष्ट्रातील मंदिर स्थापत्याचा इतिहास बघितला की मगच नगर जिल्ह्यातील या वास्तुशैलीचे वैशिष्ट्य लक्षात येते. सिंधू सरस्वती संस्कृती मध्ये मंदिराचे अस्तित्व सापडत नसले तरी नंतरच्या ग्रंथांमध्ये याचे उल्लेख सापडतात. कौटिल्याच्या अर्थशास्त्रातील लिखाणावरुन नगररचनेमध्ये देव मंदिरे कुठे असावीत त्याचा तपशील दिला आहे. मौर्य, सातवाहन, गुप्त, शुंग, कण्व, या राज्यसत्तांनंतर वाकाटक, चालुक्य, पल्लव, चोल, राष्ट्रकूट, शिलाहार,यादव अशा कितीतरी राजसत्ता भारतभर सत्ता गाजवून गेल्या. यातीलच सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, आणि यादव अशा राजघराण्यांनी आजच्या महाराष्ट्र समजल्या जाणाऱ्या प्रदेशावर राज्य केले. पण राज्यविस्तार करतानाच या राजवंशांनी आपापल्या प्रदेशात सांस्कृतिक क्षेत्रातही आपला ठसा उमटवला. मग विविध कलांबरोबरच मंदिरकलाही बहरत गेली. त्या त्या प्रदेशातील कलागुण घेऊन मंदिर स्थापत्य विकसित झाले आणि मग ते भारतीय संस्कृतीचे ठळक वैशिष्टयच झाले.
मौर्य पूर्व काळातील यज्ञाधिष्टित वैदिक धर्म हळूहळू मागे पडून हिंदू धर्म वेगळ्या रूपात फुलू लागला. विष्णू, वासुदेव, संकर्षण, शिव, स्कंद, पार्वती, या देवदेवतांच्या साकार आणि निर्गुण स्वरूपाची उपासना समाजाने सुरु केली. यातील अनेक देवता वैदिक धर्मातुन उत्पन्न झाल्या होत्या. मग या देवतांची पूजा आणि भक्ती हा धर्माचा प्रमुख भाग झाला. अशा देवता मूर्तींसाठी मग घरे म्हणजेच देवालये अस्तित्वात आली. निसर्ग पूजनातून सुरु झालेली भक्ती हळूहळू प्रतिमा रुपाने समोर येत गेली. हि मंदिरे समाजाचा केंद्रबिंदू होती. या मंदिराभोवतीच गावाची रचना होत गेली. गावाची अर्थव्यवस्थाही याच मंदिराच्या अवतीभोवती फिरु लागली.
गुप्त काळाच्या आसपास बांधलेली मंदिराची प्राथमिक अवस्था उत्तर भारतात पाहायला मिळते. त्यानंतर दक्षिण भारतातही मोठ्या प्रमाणावर मंदिर निर्मिती सुरु झाली . बाराव्या शतकापर्यंत अनेक सुंदर मंदिर रचना भारतात आणि भारत बाहेरही साकार झाल्या. यामध्ये काही वास्तूशैली निर्माण झाल्या . यात नागर शैली उत्तर भारतात, द्राविड शैली दक्षिण भारतात आणि या दोघांच्या आधाराने वेसर शैली निर्माण झाली. महाराष्ट्रात नागर शैलीतीलच काही वैशिष्ठ्ये असलेली थोडी वेगळी भूमिज शैली विकसित झाली. यालाच आपण हेमाडपंथी असे चुकून म्हणतो. नगर जिल्ह्यातील मंदिरे याच भूमिज शैलीतील आहेत. तरीही महाराष्ट्रातील इतर मंदिरांपेक्षा नगर जिल्ह्यातील मंदिरांना स्वतःची अशी वेगळी ओळख आहे.
आज नगर जिल्ह्यातील काही चांगल्या स्थितीतील व प्राचीन मंदिरांचा विचार केला तर इ. स. ११ वे ते १४ वे शतक इतक्या कालावधीचा विचार लागतो. नगर जिल्ह्यातील सगळ्यात प्राचीन व काळाचा उल्लेख असलेले मंदिर म्हणजे तहाकरीचे भवानी अथवा जगदंबा मातेचे मंदिर होय. याच्याच बरोबर रतनवाडीचे अमृतेश्वर, अकोला येथेही सिद्धेश्वर या मंदिरांचा उल्लेख करावा लागतो. श्रीगोंदे तालुक्यातील पेडगाव या गावाजवळ लक्ष्मी नारायण, बालेश्वर मंदिरे बघायला मिळतात. येथीलच महादेव, खोलेश्वर किंवा मल्लिकार्जुन, नागेश्वर, रामेश्वर मंदिरे मात्र पडझडीला आलेली आहेत. श्रीगोंदे शहरातील विठ्ठल अथवा पांडुरंग मंदिर, लक्ष्मी अथवा रखुमाई मंदिर, हटकेश्वर,रामेश्वर हि मंदिरेसुद्धा यादव काळातील आहेत. लिंपणगावाजवळील शिवमंदिर याच कालखंडातील आहे. कोपरगावाजवळील कोकमठाण येथील दामोदर मंदिर, कुंभारी येथील महादेव मंदिर तर बारागाव नांदूर या राहुरी गावाजवळील खोलेश्वर याच वेळचे आहे. येथील नागेश्वर,महादेव आणि नकटीचे मंदिरही यादव काळातील आहे.
नगर जिल्ह्यामध्ये उत्तर यादव काळातील, कमी कलाकुसर असलेली हेमाडपंती आणि पांडवकालीन म्हणून ओळखली जाणारी बरीच मंदिरे आज शेवटच्या घटका मोजत आहेत. मंदिराच्या आजूबाजूला विखुरलेले भाग, भग्न शिल्पे, बारव (विहीर),पुष्करणी या आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगून जातात. बऱ्याचदा ग्रामस्थांना याबद्दल काहीच सांगता येत नाही. कोकणगाव, वांबोरी, पारनेर, कोरेगाव,गुरव,पिंपरी,बेलवंड पठार,रेहेकुरी,भालगाव,अरणगाव अशा कितीतरी गावातून हा वारसा अवशेषांच्या रुपाने पडून आहे.
नगर जिल्ह्यातील मंदिरांचा अभ्यास केला तर काही वेगळेपण त्यात दिसून येते. त्यासाठी आपल्याला काही मंदिरांचा फेरफटका मारावा लागेल.
तहाकरीचे(टहाकरी) हे मंदिर सगळ्यात जुने पण आजही आस्तित्वात असलेले मंदिर आहे. तेथे सापडलेल्या शिलालेखानुसार ११२८ सालचे हे मंदिर भवानी अथवा जगदंबा मंदिर म्हणून ओळखले जाते. १८८० मध्ये ब्रिटिश पुरातत्व अभ्यासक हेन्री कझिन याने काढलेल्या छायाचित्रात शिखराचे अस्तित्व दिसते,जे आता शिल्लक नाही. हे त्रिदल पद्धतीचे म्हणजेच तीन गाभारे असलेले मंदिर आहे. येथे जगदंबे व्यतिरिक्त(मूळची मूर्ती अस्तित्वात नाही) महालक्ष्मी आणि भद्रकालीची मूर्ती पाहायला मिळते. या मंदिरातील मुखमंडप, सभामंडप, स्तंभ रचना खूपच सुंदर आहे. याचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे सभामंडपाचे आतील बाजूचे छत. हे अत्यंत बारीक नक्षीकामाने युक्त आहे. अशा तऱ्हेचे नक्षीकाम खूपच वेगळे आहे. छताच्या मध्यभागी असलेले नक्षीकाम बघून तर थक्क व्हायला होते. इतके बारीक नक्षीकाम दगडातून काढताना किती मेहनत लागली असेल याचा विचारच अचंबित करतो. मंदिर तारकाकृती असल्याने त्याच्या उभ्या रेषांवर आडवे थर फारच कलात्मक रीतीने सुशोभित दिसते.
गर्भगृहात पुन्हा एक वेगळेपण बघायला मिळते. येथे तीन बाजूला देवकोष्ठे (कोनाडे) आहेत. मागील बाजूला शिवाची नृत्यमुद्रेतील उग्ररुपतील मूर्ती आहे. बाकीच्या दोनही देवकोष्ठात चामुंडा आणि दुर्गा आहे. बाह्यभागावर देवदेवता,अप्सरा,सुरसुंदरी,साधू, यांच्या वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती कोरल्या आहेत. सुरसूदरींचे वेगवेगळे विभ्रम आपल्याला चकित करतात. खरंतर याचे वर्णनच करता येत नाही. तेथे प्रत्यक्ष गेल्यावरच त्याची खरी गोष्ट सांगता येते. या सगळ्यांबरोबर एक ओव्हरकोट घातलेली सुरसुंदरी पण बघायला मिळते. अशा या आडगावातील मंदिराला पर्यटकांनी आवर्जून भेट द्यायला हवी.
याच प्रमाणे अकोला जिल्ह्यातील रतनवाडी येथील अमृतेश्वर आणि अकोला गावातील सिद्धेश्वर मंदिरही वैशिष्ठ्यपूर्ण आहे. अमृतेश्वर मंदिराचे शिखर आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. त्याच्यावरुन इतर मंदिरांच्या शिखरांची कल्पना करता येते. अमृतेश्वर मंदिराबाजूची पुष्करणीच खुप सुंदर आहे. येथील कोनाड्यामध्ये विष्णूच्या अनेक पण प्रमाणबद्ध नसलेल्या मूर्ती पाहायला मिळतात. जणू काही मुख्य मूर्तिकाराच्या हाताखाली नवीन शिकाऊ उमेदवार काम करत होते. आजूबाजूला बरेच वीरगळ आणि मूर्ती ठेवलेल्या आहेत. काही वीरगळ तर मंदिराच्या सभामंडपात छताला नंतरच्या दुरुस्तीत चुकून बसवलेल्या आहेत. हे मंदिर छित्तराजाने बांधले असावे असे काहींचे मत आहे. पण नेमका इतिहास काळत नाही. मात्र श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी येथे सनद दिल्याचा उल्लेख आहे. या मंदिराचे वैशिष्ठ्य म्हणजे पूर्व आणि पश्चिम या दोनही बाजूंना दरवाजे आहेत. अशाच प्रकारची रचना अकोला येथील सिद्धेश्वर आणि हरिश्चन्द्रगडावरील शिव मंदिराची आहे. गर्भगृहाला आणि मुख्य सभामंडपालाही दरवाजा आहे. असे का केले असावे याला काही ठोस उत्तर संशोधक देत नाहीत. अशाच प्रकारचे दुसरे वैशिष्ठ्य म्हणजे मंदिराच्या स्तंभांवरती असणारे हस्त (छताच्या तुळईला आधार देण्यासाठी खांबाच्या वरती चार बाजूला असणारा आधार.) ज्याला मंदिरशास्त्रात भारवाहक,भूत अथवा किचक असे म्हणतात. हे भारवाहक नगर जिल्ह्यातील मंदिरात खूप वैशिष्ठ्यपूर्ण आहेत. या हस्तावर ज्या मूर्ती कोरल्या आहेत त्यात खुप विविधता आहे. असे हस्त इतर कुठेही क्वचितच बघायला मिळतात. हे भारवाहक जणू सगळे छत आपल्या हातावरच तोलून धरत आहोत अशा अविर्भावात कोरलेले आहेत. यांना चार,सहा,आठ हात असतात. मूषक,नरसिंह,हत्ती असे मुख असलेले भारवाहकही बघायला मिळतात. येथील मंडोवरावर म्हणजेच बाह्य भिंतीवर फारशा मूर्ती बघायला मिळत नाहीत.
सिद्धेश्वर मंदिरातही असे वैशिष्ठ्यपूर्ण भारवाहक बघायला मिळतात. या मंदिराचे पुनर्निर्माण पेशवे काळात झाल्याचे समोरील सभामंडपावरुन लगेच लक्षात येते. सततच्या पुरामुळे हे मंदिर जमिनीखाली गडप झाले होते. १७८० साली जमीन नांगरताना सापडले. येथे काही कागदपत्रे आणि नाणी सापडल्याचे उल्लेख आहेत. या मंदिरात सभामंडपात आतील छताच्या बाजूला काही प्रसंग कोरलेले आहेत. यात उंटाचे अंकनही पाहायला मिळते. बाहेरील भिंतींवरील दोन देवकोष्ठात तांडवनृत्य करणारा शिव आणि कालीची मूर्ती आहे.
पेडगाव येथील लक्ष्मी नारायण मंदिराचे स्थानच फार सुंदर आहे. नद्यांच्या संगमावरील हे मंदिर इतिहासाच्या काही कटू आठवणी पण जवळ बाळगून आहे. मंदिराचे सभामंडपातील अत्यंत कलाकुसर केलेले स्तंभ बघत राहावेसे वाटतात. गर्भगृहाबाहेरील पायरी जिला चंद्रशिला म्हणतात ती अत्यंत बारीक तपशिलांनी कोरलेली आहे. तेथील विविध नक्षीची जालवातायने ( खिडक्यांच्या जाळ्या ),भारवाहक, बाह्य भिंतीवरील मूर्ती शिल्पे वैशिष्ठ्यपूर्ण आहेत.येथील प्रत्येक मूर्ती आपल्याला काहीतरी गोष्ट सांगते. साधू, सुरसुंदरी, वृक्षिका याचबरोबर मुख्य देवदेवता कोरल्या आहेत. यात विष्णू, ब्रम्हा, शिव, भैरव, नरसिंह मूर्तीबरोबरच भूवराहाची खुप सुंदर मूर्ती आहे. या मंदिरासमोर बालेश्वर मंदिर पडक्या अवस्थेत उभे आहे. पण मुळातच हे मंदिरही खूप सुंदर असणार यात शंका नाही.
असेच खूप सुंदर आणि शिखरासकट अस्तित्वात असलेले मंदिर म्हणजे कोपरगाव येथील दामोदर मंदिर. सध्या हे महादेवाचे मंदिर म्हणून ओळखले जाते. कझिन्सने याचा उल्लेख देवीचे मंदिर म्हणून केला आहे. गावकरी पण जगदंबेचे मंदिर आहे असे म्हणतात. गर्भगृहाच्या ललाट बिंबवरील गरुडाची नमस्कार मुद्रेतील मूर्ती मात्र हे मंदिर विष्णूरूपाचे आहे हे ठामपणे सांगते. हे मंदिर दगड आणि विटा या दोनही साधनांपासून बनवले आहे. मंदिराचे नक्षीकाम, मूर्तिकाम अप्रतिम आहे. त्यासाठी तरी एकदा याला भेट देणे गरजेचे आहे. याचे वैशिष्ठ्य म्हणजे कधीकाळी मंदिराला गिलावा करून रंगवलेले असावे. तसेच येथील वितान(आतील छत) करोटक प्रकारचे असून त्याचे भाग नरपट्टीका, रुपपट्टीका, कर्णदर्दुरक, रुपकंठ ,कोला, विद्यादेवी, लूम, गजतालू, आणि शेवटी पद्मशीला या नावाने ओळखले जातात. या मंदिरावरही सुरसुंदरी, गंधर्व, अप्सरा कोरलेल्या आहेत. उडणाऱ्या चार हातांच्या सहा गंधर्वांची शिल्पे आवर्जून बघायला हवीत.
कोपरगावाजवळच कुंभारी येथील मंदिर बाह्यभागामुळे आधुनिक वाटते पण आत अजून जुने अवशेष शिल्लक आहेत. श्रीगोंदा भागातील मंदिरे आता खूप बदलली आहेत मात्र त्यांचा मूळ ढाचा तसाच आहे. येथील महालक्ष्मी मंदिर मात्र खूप शोधावे लागले. लिंपणगावातील सिद्धेश्वर मंदिर ऑइल पेंटने रंगवल्यामुळे मूळचे सौंदर्य लोपले आहे. येथील नंदी मंडप मंदिरापासून वेगळा आहे. असाच नंदी मंडप कर्जत तालुक्यातील नकटीच्या मंदिरामध्ये आहे. लिंपणगावाप्रमाणेच नकटीच्या मंदिरालाही तटबंदी आहे. याच प्रमाणे राहुरी येथील बारागाव नांदूर येथे अगदी लहानसे मंदिर शिल्लक आहे. अशी अनेक मंदिरे स्वतःची राहिलेली वैशिष्ठ्ये अंगाखांद्यावर घेऊन अजूनही पूर्वजांच्या गोष्टी सांगत आहेत त्याऐकायला आपल्याला वेळ काढावा लागेल. आपल्याला मिळालेला हा वारसा खूप ऐश्वर्य संपन्न आहे. तो प्रत्येक गावाने एकत्र येऊन जपायला हवा. पर्यटक तेथ पर्यंत पोहोचायला हवेत. त्या त्या गावात उत्तम गाईड तयार झाले तरच तो वारसा पुढील पिढीला सांगितला जाईल आणि मगच त्याची जपणुकही होईल.