महाराष्ट्राच्या अंगाखांद्यावर अनेक सुंदर सुंदर पर्यटन स्थळे वसली आहेत. खळाळत्या समुद्रकिनाऱ्यांपासून ते सह्याद्रीच्या कड्यांपर्यंत. सातपुड्याच्या रांगांमधल्या पानगळीच्या जंगलांपासून ते तेलंगणा आणि कर्नाटकला भिडणाऱ्या दख्खनच्या पठारापर्यंतची विविधता या महाराष्ट्राच्या नकाशावर पसरलेली आहे. आणि याच विविधतेमुळे अनेक प्रकारची पर्यटनस्थळांची मेजवानी पर्यटकांसाठी उपलब्ध आहे. याच रांगड्या महाराष्ट्रात अनेक राजसत्ता नांदल्या, त्यातलीच एक राजसत्ता होती कल्याणी चालुक्यांची.
नांदेड जिल्हा हा काही पर्यटनासाठी प्रसिद्ध जिल्हा नाही. मात्र नांदेड जिल्ह्यामध्ये पर्यटकांना आकर्षित करणारी अनेक स्थळे आहेत. असेच एक ठिकाण म्हणजे महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सिमेजवळ वसलेले होट्टल. नांदेड परिसरामध्ये चालुक्यांचे अनेक मांडलिक राजे होते. आणि नांदेड जिल्ह्यातील, देगलूर तालुक्यात, देगलूर पासून केवळ १२ किमी अंतरावरचे होट्टल ही काही काळ कल्याणी चालुक्यांची राजधानी होती. कल्याणी चालुक्यांच्या आधी होट्टलवरती काही काळ बदामी चालुक्य आणि त्याआधी राष्ट्रकुटांची सत्ता होती, तर चालुक्यांनंतर काही काळ होट्टल यादवांच्या ताब्यात होते. शेवटी हा सर्व परिसर बहामनी आणि आदिलशाहीच्या सत्तेखाली राहीला.
नांदेड जिल्ह्यात सापडलेल्या कल्याणी चालुक्यांकालिन एकूण २३ शिलालेकांपैकी ३ हे होट्टल मंदिर परिसरात पहायला मिळतात. या शिलालेखांचा विचार केला तर होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिर सुमारे १२०० वर्षांपूर्वी म्हणजे ११ व्या शतकात सिद्दगी नावाच्या स्थापत्यविशारदाने बांधले. पूर्वाभिमुखी मुखमंडप हा अतिशय सुंदर अशा चार खांबांवर तोललेला आहे. या खांबांवर अनेक भौमितीक आकार, वेलबुट्टी आणि किर्तिमुख कोरलेले आढळतात. त्याचसोबत मध्यभागी अतिशय देखणे असे पुष्पचित्र आढळते. तर आतिल प्रमुख मंडप हा १६ खांबांच्या आधारावर उभा आहे. या खांबांवरही अतिशय देखणी अशी शिल्पे कोरलेली आहेत. या प्रमुख मंडपाच्या बाजूला भाविकांना विश्रामासाठी बांधलेले अर्धमंडप आहेत जे चार चार खांबांवर उभारलेले आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये शिवलिंग असून गाभाऱ्याच्या भिंतींवरमात्र कोणतेही शिल्प अथवा कोरीवकाम आढळत नाहीत. मंदिराच्या बाहेरच्या भिंतींवर तळापासून कळसापर्यंत विविध थरांमध्ये अनेक मुर्ती कोरलेल्या आढळतात. नर्तिका, यक्ष, देवता आणि वादक कलाकारांची अतिशय देखणी अशी ही शिल्पे आहेत. आरशात बघणारी सुंदरी, तालवाद्य वाजवणारी, पक्षांना खायला घालणारी, नृत्याविष्कार दर्शवणारी अशी नर्तिकेची अनेक रूपे येथे पहायला मिळतात. तसेच अनेक यक्षप्रतिमा, देवता यांचाही आविष्कार या भिंतींवर होतो.
सिद्धेश्वर मंदिराच्या दक्षिणेला केवळ १०० फुटांच्या अंतरावर पार्वती मंदिर पहायला मिळते. शंकर आणि पार्वती मंदिरे अशी एकत्रितरित्या फार क्वचित बघायला मिळतात. या मंदिराची बांधणी मात्र रेब्बानायक या अधिकाऱ्याच्या देखरेखीत झाली. याचा आकार जरी सिद्धेश्वर मंदिराएवढाच असला तरी याच्या बाह्य भिंतींवरची शिल्पे थोडी वेगळी आहेत. तसेच याच्या गाभाऱ्यात देवीचे प्रतिक आहे. या मंदिरातील एक प्रमुख आकर्षण म्हणजे गाणारी शिळा. साधारणपणे १५ फूट लांबीच्या या शिळेवर जर हलका आघात केला तर याच्या वेगवेगळ्या भागातून सा, रे, ग, म, प, ध, नि, सा असे वेगवेगळे सूर ऐकायला मिळतात.
सिद्धेश्वर मंदिरापासून काही अंतरावर नुकतेच शोध लागलेले मंदिर आहे सोमेश्वर मंदिर. या मंदिराच्या पश्चिम द्वाराजवळच्या शिलालेखाप्रमाणे सहाव्या विक्रमादित्याच्या कालावधीमध्ये या मंदिराला त्रिपुरुष मंदिर असे म्हंटले जायचे. याचा अर्थ ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचे मंदिर. आज याच्या गाभाऱ्यात किंवा गाभार्याच्या बाजूच्या दालनांमध्ये कोणत्याही मुर्ती नाहीत मात्र अभ्यासानुसार मुळ गाभाऱ्यात शिवलिंग असावे, उत्तरेकडील दालनात विष्णू तर दक्षिणेकडील दालनात ब्रह्मदेवाची मुर्ती असावी असा अंदाज आहे. या मंदिराचे उत्खनन अजूनही चालू आहे. मात्र जो भाग आज पहाता येतो त्यानुसार याच्या भिंतींवर महाभारतातील प्रसंग, विविध मानवाकृती, देवता, प्राणी, पक्षी, वनस्पती वगैरेंची शिल्पे पहायला मिळतात. देवळाच्या मागे असलेली विहीर ही देखील प्राचिन काळापासून असावी असा अंदाज आहे. या विहिरीच्या काठावर काही देवता, नाग यांच्या मुर्ती आढळतात
स्थानिकांसोबत झालेल्या चर्चेनुसार होट्टल-देगलूर परिसरामध्ये १० व्या शतकापासून १२ व्या शतकापर्यंत बांधण्यात आलेली अनेक मंदिरे आहेत. त्यांचा अभ्यास आज सुरू आहे. हंपी-बदामी अथवा दक्षिणेतील होयसाळ वगैरे काळात बांधण्यात आलेल्या अनेक मंदिर समुहांप्रमाणेच नांदेडमधील होट्टल परिसर देखील असाच मंदिर समुहाने नटलेला आहे. अधिकाधीक पर्यटकांनी या ठिकाणांना भेट दिली तर सहाजिकच या भागाचा विकास होण्यास नक्कीच मदत होईल. एकदा नाही तर अनेकदा भेट द्यावी असे हे १२ व्या शतकातले अद् भूत असे बांधकाम राखणे ही आपली जबाबदारी आहे.
होट्टलला पोहोचण्यासाठी नांदेड पर्यंत रेल्वे, तेथून देगलूर मार्गे होट्टलला जाता येईल. तसेच स्वतःच्या वहानाने प्रवास करायचा झाल्यास रस्ते देखील उत्तम आहेत. केवळ कमतरता आहे ती स्वच्छ स्वच्छतागृह आणि चांगल्या खानपान सेवेची. होट्टल परिसरात एकही चांगले हॉटेल नाही. तेव्हा पाणी आणि खाणे सोबत न्यावे. देगलुरला काही प्रमाणात रहाण्याची सोय होवू शकते. मात्र उत्तम हॉटेल्स हवी असल्यास नांदेडला मुक्काम करावा.